+91 8668544177

३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.

   shreemangal15@gmail.com

‘श्रीग्रुप फाऊंडेशन’ विषयी

स्थापना : २५ मे २०००

नोंदणी क्र.: ६५९२ दि. २५.५.२०००

संस्थापक अध्यक्ष : जी.एम.जाधव

ऐशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात उच्च व्यावसायिक शिक्षणासाठी खाजगी महाविद्यालये सुरु करण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ लागला. या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. नाशिकच्या माझ्या एका मित्राच्या मुलाने मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला होता.
त्यासाठी त्याला द्यावी लागलेली मोठी रक्कम मला समजली आणि माझे डोके गरगरले. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला एवढी मोठी रक्कम मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उभी करणे त्यावेळी शक्य होणार नव्हते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले तरी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळेलच, याची खात्री नव्हती. आपली मुलं अजून माध्यमिक शाळेत आहेत. पुढे बारावीच्या परीक्षेत त्यांनी चांगले मार्क्स मिळविले तरी त्यांना उच्च व्यवसायिक शिक्षण घेता येणे शक्य होईल का ? याचा विचार मी त्यावेळी करत होतो. केवळ आपल्याजवळ खाजगी महाविद्यालयांना देण्यासाठी मोठी रक्कम नाही म्हणून आपल्या मुलांना उच्च व्यवसायिक शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? असा प्रश्न मनाला भेडसावू लागला. यासाठी काहीतरी करायला हवे, असे मला वाटत होते; पण नक्की काय करावे, ते मात्र सुचत नव्हते. २६ जानेवारी १९८९ रोजी समाजाचा पहिला राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय मेळावा आम्ही घेतला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चांगल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली होती. मेळाव्याचे कामकाज संपलेले असले तरी आमचे भेटणे पुढे सुरूच होते. हे सर्व कार्यकर्ते माझ्याच वयोगटातील होते. त्यांचीही मुले प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेत शिकत होती. एके दिवशी माझ्या मनातील ही कल्पना मी त्यांना बोलून दाखविली. ती त्यांना खूप आवडली. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी आतापासूनच रक्कम उभी करण्याची ही योजना होती. २८ नोहेंबर १९९१ या दिवशी समविचारी पंचवीस मित्रांची पहिली सभा मी बोलाविली व योजनेला मूर्त स्वरूप देण्यात आले. या योजनेचे आम्ही फक्त पंचवीस सभासद राहणार होतो. प्रत्येक सभासदाने दरमहा दोनशे रुपये या योजनेत द्यावयाचे होते. त्याप्रमाणे दरमहा रुपये पाच हजार म्हणजेच वर्षाला साठ हजार रुपये जमा होणार होते. या जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग भविष्यात आमच्या मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आणि कुटुंबातील व्यक्तींच्या मोठ्या आजारपणासाठी वापरणार होतो. ही रक्कम परतफेडी कर्ज म्हणून देण्यात येणार होती. या योजनेचे दैनंदिन काम पाहण्यासाठी अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांची निवड दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली जाणार होती. ही योजना सगळ्यांना आवडली व त्याची अंमलबजावणी त्याच दिवशी सुरु करण्यात आली. योगायोगाने तो दिवस म्हणजे माझा त्रेचाळीसाव्वा वाढदिवस होता...!